अज्ञानातील नुकसानामुळे होणाऱ्या खर्चापेक्षा प्रशिक्षणावर होणारा खर्च कमी असतो आणि म्हणूनच शैक्षणिक धोरणामध्ये बदल झाले की शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या खर्चाचा विचार न करता शिक्षकांना नवे धोरण समजावून सांगण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते आणि माझ्या मते हे योग्यच असते.
नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ येथे 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान माझे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० तिसऱ्या टप्प्यात पूर्ण झाले. शिक्षकांच्या जुन्या धारणांना उजाळा देत असताना परिपूर्ण तयारी करून, अभ्यास करून आलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 चा परिचय करून दिला आणि त्यातल्या बदलांना आपल्या दैनंदिन शैक्षणिक जीवनात कसे अंमलात आणावयाचे हे अतिशय सुंदररित्या समजावून सांगितले.
सहावी ते आठवी वर्गांना अध्यापन करत असलेल्या शिक्षकांच्या कुलास श्री अमोल कांबळे सर कुलप्रमुख होते. उद्घाटनानंतरच्या अगदी सुरुवातीच्या तासामध्ये त्यांनी प्रशिक्षण योग्य रीतीने पार पाडण्यासाठी झालेल्या नियमावलीचे पालन कसे करावे हे समजावून सांगत प्रशिक्षण घेण्यास आलेल्या शिक्षकांनी काय केले म्हणजे हे प्रशिक्षण व्यवस्थित संपन्न होईल हे शिक्षक बांधवांना आवडेल अशा भाषेत, अगदी त्यांच्या बारीकसारीक सवयींचा आदर करत समजावले. हे मला अधिक भावले. या कुलामध्ये अगदी शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या शिस्तीमध्ये मला या सुरुवातीच्या मायाळू सूचनांचा प्रभाव जाणवला.
SQAAF शाळा मूल्यांकनाचा हा अगदी नवीन विषय घेऊन श्री शिवराम राडकर सर यांनी पहिल्या तासिकेस सुरुवात केली. प्रशिक्षणास येण्यापूर्वीच तसा ओझरता हा विषय कानावर आलेला होता; परंतु प्रशिक्षणामध्ये त्यातील क्षेत्र, उपक्षेत्र, मानके, काय करावे, काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती मिळाली. प्रत्येक मुद्द्यांना विस्तार करत असताना उदाहरणे देण्याची आणि ओघवत्या भाषेत समजून सांगण्याची त्यांची पद्धत मला आवडली. चौथ्या दिवशीही त्यांची समग्र प्रगती पत्रकावर एक तासिका झाली.
SQAAF या विषयात आता मी नेमका 'प्रवाह' मध्ये होतो आणि त्यातून मला 'पर्वत' भागात आणण्याचे काम दुसऱ्या तासिकेत श्री जाधव बाळासाहेब सर यांनी केले. मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, समाज या सर्वांची भूमिका समजावून घेतली. दिव्यांग विद्यार्थी, व्यवस्थापन ते थेट 'लाभार्थ्यांचे समाधान' पर्यंतचे नवे ज्ञान या तासिकेत झाले.
पहिल्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात शिक्षक मित्रांसाठी महत्वाचा असणारा 'क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया' हा विषय घेऊन श्री बडे शशिकांत सर उपस्थित झाले. शांत, संयमी आवाज आणि मुद्द्यानुसार पुढे जाण्याची त्यांची वृत्ती छान वाटली. लक्ष्ये, ध्येये, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती या गोष्टींवर त्यांनी टाकलेला प्रकाश नवे शैक्षणिक धोरण समजावून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरला. चौथ्या दिवशी परत एकदा दुपारच्या सत्रात श्री शशिकांत बडे सर यांनी क्षमतावर आधारित मूल्यांकनाची पद्धत समजावून सांगितली.
वर्गातील शेवटच्या व्यक्तीचेही अवधान खेचून घेणारा पहाडी आवाज घेऊन आले ते श्री सरवदे आर बी सर! क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनीती ही पारंपारिक मूल्यमापन पद्धतीपेक्षा वेगळी कशी आहे हे चर्चात्मक पद्धतीने त्यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींना समजावून सांगितले. मूल्यांकनाची विशिष्ट रचना समजून घेण्यासाठी त्यांच्या तासिकेचा उपयोग झाला.
दुसऱ्या दिवशी NEP 2020 अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची सखोल माहिती देणारी पहिली तासिका सुरू झाली सकाळच्या सत्रात ती श्री सूर्यवंशी सर यांची. "नूतन भारत का सपना, हर बच्चा समझे...." असे म्हणून वाक्य पूर्ण करण्यासाठी पुढील शब्द त्यांनी सोडून दिला, सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी "अपना" हा शब्द लावून ते वाक्य पूर्ण केले आणि सरांनी बरोबर आम्हा सगळ्यांना तिथे पकडले! "नूतन भारत का सपना, हर बच्चा समझे भाषा और गणना।" असे ते वाक्य होते, घोषणा होती! FLN, ECCE, Logical thinking भारतीय संविधान, तंत्रज्ञान, मूलभूत कौशल्ये, AI चा शिक्षणात समावेश अशा अनेकविध विषयांना स्पर्श करत त्यांनी ही तासिका अतिशय कौशल्याने पूर्ण केली. शेवटच्या दिवशी रुबिक्स ही मूल्यांकनाची पद्धतही श्री सूर्यवंशी सर यांनी उदाहरणांसह छान समजावून दिली.
शिक्षणाच्या नव्या रचनेचा 'पायाभूत स्तर' विस्तृतपणे समजला तो श्री रवींद्र जोशी सरांच्या दुसऱ्या तासिकेत. प्रत्येक बालक शिकू शकते आणि शिक्षकांना आता सुलभकाची भूमिका बजावयाची आहे अशा गोष्टींची भर देतानाच या स्तरावर खेळ आणि कृती आधारित शिक्षण द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. या तासिकेत मला माझ्या शाळेतील कृतीवर आधारित उपक्रमांची माहिती देण्याची संधी त्यांनी दिली. चौथ्या दिवशी दुसऱ्या तासिकेत श्री रवींद्र जोशी सर यांनी प्रश्न निर्मितीचे गटकार्य पूर्ण करून घेतले आणि आम्हाला सादरीकरणाची संधीही दिली. यानिमित्ताने गटकार्य करत असताना नवे मित्र मिळाल्याचा आनंद झाला.
"एखाद्या बॉटलची क्षमता एक लिटरची आहे, आता ती क्षमता तुम्ही कशी वाढवू शकता? नाही ना वाढवता येत? मग शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कशासाठी?", असा चिंतनात्मक प्रश्न वर्गात देऊन श्री अमोल कांबळे सर यांनी आपल्या तासिकेला दुपारच्या सत्रात सुरुवात केली. Capacity and Competency या दोन इंग्रजी शब्दांचे अर्थ सांगताना क्षमता निर्जीवातली वाढवता येणार नाही परंतु सजीवातली वाढवता येईल म्हणूनच सजीवांसाठी Competency हा शब्द योग्य आहे हे सर्वांना छानच समजले. शैक्षणिक धोरणांचा प्रवासही त्यांनी क्रमबद्ध पद्धतीने समजावून दिला.
'क्षमता आधारित प्रश्न प्रकार' या विषयाची तासिका श्री इंगोले सर यांनी घेतली. प्रश्नांची रचना, त्यांचे प्रकार, कसे असावेत आणि कसे नसावेत याबद्दल सविस्तर माहिती त्यांच्या तासिकेतून मिळाली. पाचव्या दिवशीच्या तासिकेत श्री अमोल सरांनी समग्र प्रगती पत्रकाबद्दलची चर्चा घडवून आणली आणि प्रशिक्षणार्थींच्या मनात असणाऱ्या शंका दूर केल्या.
उत्तम कलाकार, चित्रकार आणि कवी असलेले श्री सिद्धेश्वर इंगोले सर यांना ऐकण्याची संधी मिळाली ती 'क्षमता आधारित प्रश्न प्रकारावर.' क्षमता आधारित प्रश्न प्रकाराबद्दलची माहिती देत असताना त्यांनी सॉक्रेटिसची आठवण करून देत उत्तमपणे प्रश्न प्रकार समजावून दिले. प्रश्न कशाप्रकारे अध्ययन अध्यापनात उपयुक्त असतात हे त्यांच्या मांडणीतून अधिक स्पष्ट झाले.
तिसरा दिवस अर्थात 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन. सर्व कुलांना एकत्र करून मराठी भाषा गौरव दिनाची माहिती देण्यात आली.
आमच्या कुलावर पहिली तासिका झाली पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणारे कवी, शाहीर श्री अनंत मुंडे सर यांची. खळाळत जाणारा प्रवाह जसा सहज मार्ग काढत पुढे जातो तसेच या तासिकेतील आशय, मुद्देही सहजगत्या आणि आशयानुरूप कवितांच्या सोबतीने श्री अनंत मुंडे सरांच्या गोड आवाजात पुढे जात होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणात असणारे विषय आणि त्यांचे महत्त्व याबद्दल त्यांनी माहिती दिली. आव्हानाशिवाय प्रगती होऊ शकत नाही हे सांगत असताना त्यांनी गरुडाची गोष्ट सांगितली. माजलगाव चे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री प्रभाकर साळेगावकर यांच्या 'बळ उडाया दे रे' या कवितेने त्यांनी आपल्या तासिकेचा समारोप केला.
आपलाच शिष्य आपल्यासमोर उभा राहून उत्तम पद्धतीने अध्यापन करत असल्याचा आनंद गुरूला जसा मिळतो तसाच आनंद श्री संजय कळसे सर यांच्या तासिकेत मला मिळाला. मी दिलेल्या अनेक प्रशिक्षणामध्ये श्री संजय कळसे सर प्रशिक्षणार्थी म्हणून असायचे. प्रशिक्षक म्हणून स्वतःची प्रगती कशी होत गेली हे सांगत असतानाच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील अनेक मुद्द्यांना उत्तमपणे स्पर्श केला. शिक्षणाच्या धोरणात बदल होत असताना शिक्षकांनी ते सकारात्मकपणे कसे स्वीकारावेत यावर त्यांचा भर होता.
दुपारच्या सत्रात होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड अर्थात समग्र प्रगती पत्रकाबद्दलची सविस्तर माहिती श्री मोहन गित्ते सर यांनी दिली. या घटकाचा त्यांनी उत्तम अभ्यास केलेला असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांशी चर्चा करतच प्रगती पत्रक लिहिण्यात झालेला हा बदल त्यांनी उत्तमपणे समजावून सांगितला. विद्यार्थी स्वतः, त्याचा मित्र, पालक आणि शिक्षक या सर्वांवरच आता या प्रगती पत्रकाच्या मुद्द्यांना भरण्याची जबाबदारी आहे.
काही चित्रपटात जशी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्याची ताकद असते अगदी तशीच ताकद आपल्या वाणीत असणारे श्री जीवन बाजगीर सर! प्रशिक्षणार्थी शिक्षकांना आवडतील असे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात असणारे मजेशीर उदाहरणे देत आपला मुद्दा अगदी सहजपणे पटवून देणारे जणू इंदुरीकर महाराजांचे पट शिष्य! SQAAF बद्दलच्या त्यांच्या तासिका हसतखेळत संपन्न होत. या पाच दिवसात दोन तासिका मध्ये श्री जीवन बाजगीर सर यांनी दिलेली समग्र प्रगती पत्रकाची माहिती कायम लक्षात राहील.
एकंदरीतच हे प्रशिक्षण माझ्या अनेक क्षमता वाढवणारे ठरले.
१) मोबाईल पासून दूर राहून प्रत्यक्ष आपल्यासमोर सादर होणाऱ्या व्याख्यानास उपस्थित राहता आले आणि त्यासाठीची असणारी माझी बैठक क्षमता वाढवता आली.
२) मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून तो मध्यंतरातच पाहायचा हे मी पक्के ठरवलेले होते त्यामुळे मोबाईल पासून दूर राहणे मला शक्य झाले.
३) सज्जनांच्या संगतीत अनेक विषयांना स्पर्श होत असतो आणि कधी कधी त्यांच्या सुंदर उपक्रमांना आपल्या शाळेत राबवण्याचे निश्चय पक्के होत असतात. अनेक चांगल्या गोष्टी समोर येत असतात; जसे की मिरवटचे श्री अरविंद चौधरी सर यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विमान सहलीला कसे नेता आले हा चांगला मुद्दा सगळ्यांसोबत शेअर केला.
४)तालुक्यातील अनेक अशा तज्ज्ञ शिक्षकमित्रांशी मध्यंतरामध्ये गप्पागोष्टी करता आल्या.
५) सुरुवातीला झालेल्या पूर्व चाचणीमध्ये मला 19 मार्क मिळाले होते आणि शेवटच्या उत्तर चाचणीत मला 30 मार्क मिळाल्याचाही आनंद होता.
६) सुरुवातीपासून प्रत्येक तासिकेत नोट्स घेण्याचे मी ठरवलेच होते. मोबाईल मुळे आता लिहिणेही फार कमी झाले आहे तेव्हा हाताची लिहिण्याची क्षमता वाढू द्यायची म्हणून हा निश्चय होता. त्याचा फायदा उत्तर चाचणीत झालाच; कारण लिहिल्यामुळे बरेचस मुद्दे स्मरणात कायम राहिली होते.
७) शिक्षकांनी स्वतःला व्यवसायासाठी किंवा आनंदाने होणाऱ्या या सेवेसाठी, या सर्वांग सुंदर धर्मासाठी स्वतःला सज्ज करावे आणि हे प्रशिक्षण किंवा यासारखी प्रशिक्षणे जेव्हा जेव्हा येतील तेव्हा ते तितक्याच तन्मयतेन घ्यावेत असा माझा एक प्रेमळ सल्ला...
श्री चंद्रशेखर फुटके
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी, केंद्र मिरवट